ठाणे - कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाट ( Malshej Ghat Bus Driver Suicide ) दरीत एका एसटी वाहकाने दरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गणपत इडे असे आत्महत्या करणाऱ्या एसटी वाहकाचे नाव आहे. ते भंडारदरा येथे कुटूंबासह राहत होते.
कल्याण ते अकोले ही अकोले एसटी आगरची बस आज दुपारच्या सुमारास कल्याणहून नगर जिल्ह्यातील अकोले बस आगरमध्ये निघाली होती. त्यातच याच एसटीत वाहक म्हणून मृत गणपत कार्यरत होते. मात्र, आज दुपारच्या सुमारास एसटी बस माळशेज घाट चढत असतानाच वाहक गणपत यांनी अचानक घाट दरीत उडी घेतली. घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी दरीत वाहकाचा मृतदेह शोधून उत्तरणीय तपासणीसाठी मुरबाड मधील शासकीय रुग्णालयात रवाना केला. मात्र, वाहक गणपत यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आले नाही. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती टोकावडे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - MSP 'Approved: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! खरीप पिकांच्या MSP'ला दिली मंजूरी