ठाणे - लग्न समारंभ विशेष करण्यासाठी आजकाल लग्नात नवनवीन कल्पना वापरल्या जात आहेत. लग्नात इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे यासाठी अंबरनाथ पश्चिम येथील कानसई गावात राहणारी नववधू विवाहस्थळापर्यंत स्वतः जीप चालवत आली. नववधूची ही डॅशिंग एन्ट्री पाहून वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी नवरीच्या एन्ट्रीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
डॅशिंग राहण्याची आवड असलेल्या हर्षदाचे लग्न नवी मुंबईतील क्रिकेटर अनुप पाटीलसोबत आनंद सागर येथे झाले. मात्र, कोणाची झाली नाही अशी दिमाखदार एन्ट्री आपल्या बहिणीची व्हावी अशी इच्छा हर्षदा आणि तिच्या भावाची होती. आपल्या मुलीची इच्छा हर्षदाचे वडील रमेश भोईर यांनी पूर्ण केली. लग्नसोहळ्यात हर्षदा स्वतः जीप चालवत आली. नवरदेव वाट पाहत होता. नववधू हर्षदा स्वतः जीप चालवत आलेली पाहून नवरदेवाकडील वऱहाडी मंडळींसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हर्षदा आणि तिच्या भावाची दिमाखदार एन्ट्रीबाबतची असलेली इच्छा पूर्ण झाली. यापूर्वीही एका नवरीची बुलेट चालवत लग्नमंडपातील एन्ट्री सोशल मीडियावर गाजली होती.