ठाणे - शहरातील सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. ठाणे न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली असून जामिन दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या मारहाण प्रकरणात तीन पोलिसांपैकी मुंबईतील दोन आणि ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी आहे. ठाण्यातील पोलीस हा पोलीस मुख्यालयातील तर मुंबईमधील 2 पोलीस हे मुंबई सुरक्षा विभागामधील आहेत. दरम्यान, सहा महिन्यानंतर केलेल्या कारवाईचे स्वागत असले तरी,या प्रकरणातील मोकाट असलेला मुख्य सूत्रधार गजाआड होणार का, असा सवाल भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करत इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून उचलून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्यावेळी मंत्री आव्हाड उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. ५ एप्रिलला मध्यरात्री करमुसे यांना घरातून आव्हाडांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिघा पोलिसांनी नेले होते. या प्रकरणी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद झाली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या प्रकरणात सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी कारवाई करून तिघा पोलिस शिपायांना अटक केली. या प्रकरणात सहा महिन्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याबद्दल ठाणे पोलिसांचे मन:पूर्वक अभिनंदन. अटक केलेल्या तिघाही पोलीस शिपायांचे करमुसे यांच्याबरोबर वैयक्तिक वाद नाहीत. त्यांनी करमुसे यांना कोणाच्या आदेशावरुन घरातून आणले. या संदर्भात कसून चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा छडा लावण्याची आवश्यकता आहे. यातील मुख्य सुत्रधारावर कारवाई केव्हा होणार, असा सवाल डावखरे यांनी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधानानी 5 एप्रिलच्या रात्री दिवे लावण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला विरोध करत जिंतेंद्र आव्हाड यांनी विरोधी प्रतिक्रिया सोशल मीडियात व्यक्त केली होती. त्यावर ठाण्यातील उन्नती वुडस येथे राहणारे अनंत करमुसे या इंजिनियरने आव्हाड यांच्या विरोधात फेसबुकवर एक पोस्ट टाकली. त्याचाच राग मनांत धरुन 5 एप्रिलच्या रात्री 11:50 च्या सुमारास दोन गणवेषातील पोलीस व दोघे साध्या वेषातील पोलीस या तरुणाच्या घरी आले आणि तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवले आहे, असं सांगून बळजबरीने स्कॉर्पिओ व इनोव्हा गाडीतून सायबर गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याऐवजी थेट जितेंद्र आव्हाड यांच्या विवियाना माॅलमागील नाथ बंगल्यावर नेऊन मारहाण केली होती.