ठाणे - महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत २७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंब्रा येथील एका दफनभूमीतच कोरोनाने १४२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची कागदोपत्री नोंद आहे. यावरून असे दिसते की, मुंबईप्रमाणेच ठाण्यातही मृतांची संख्या दडपण्यात येत आहे. ठाण्यात ८०० नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची शंका असून, त्यातील ४०० मुंब्रा येथील आहेत, असा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंब्रा येथील चारपैकी दोन दफनभूमींची क्षमता संपल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित दोन्ही दफनभूमी महिनाभरात बंद पडतील, याकडे आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले.
कोरोनामुळे ठाणे शहरातील परिस्थिती गंभीर होत असून विविध उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी तत्कालीन आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाणे महानगरपालिकेकडून मृतांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाबाबत महापालिका प्रशासनाला खात्री देण्यासाठी सोमय्या, निरंजन डावखरे आणि महापालिकेतील भाजपा गटनेते संजय वाघुले यांनी आज मुंब्रा येथील दौरा केला.
तेथील चारही दफनभूमीतील नोंदीनुसार रुग्णांची माहिती घेतली. त्यावेळी एम एम व्हॅलीनजीकच्या एका स्मशानभूमीत कोरोना व कोरोना संशयित म्हणून तब्बल १४२ नागरिकांचे दफनविधी झाले असल्याचे तेथील रखवालदाराने आणि कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. २२ मार्चपासून दररोज १४ ते १५ मृतदेह येत होते. यानुसार मुंब्रा-कौसा भागात कोरोनामुळे जवळपास ४०० जणांचे मृत्यू झाल्याचा संशय आहे. तर ठाणे शहरात ही संख्या ८०० पर्यंत आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.
मुंब्रा दफनभूमीत मार्चमध्ये ७४, एप्रिलमध्ये १६० आणि २३ जूनपर्यंत १७३ नागरिकांचे मृतदेह आले. कौसा दफनभूमीत मार्चमध्ये ६३, एप्रिलमध्ये ८२, मेमध्ये २४० जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत २७७ मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. मात्र, मुंब्रा-कौसा भागातच १ एप्रिल ते २३ जूनपर्यंत ९५३ नागरिकांचे दफनविधी पार पडले आहेत. कोरोनामुळेच मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे, याकडे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे किरीट सोमय्या यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
दरम्यान, या दफनभूमीतील कर्मचारी पीपीई किटविना कार्य करत असल्याचे आढळले. त्यावेळी त्यांना भाजपाच्यावतीने पीपीई किट देण्यात आले.