ठाणे - भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्टा असलेल्या वळ गावाच्या हद्दीतली एका गोदामातून नारपोली पोलिसांच्या हाती २५ कोटी रुपयाचे बनावट पॅकिंगचे साहित्य लागले. या विषयी माहिती भिंवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पत्राकर परिषदेत दिली.
भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध पारसनाथ कंपाऊंड मधील गाळा क्रमांक आठमध्ये एचपी, कॅनोन, सॅमसंग, इपसोन या इलेक्ट्रनिक कंपनीच्या प्रिंटर मशीनच्या पॅकिगसाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले. हे पंचवीस कोटींहून अधिक रक्कमेचे साहित्य बुधवारी दुपारी छापा टाकून जप्त करण्यात आले. या वेळी एका आरोपीला नारपोली पोलिसांनी अटक केली.
किशोर आंबा बेरा (वय २८) अशे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पारसनाथ कंपाऊंड येथील गोदामात एचपी, कॅनोन सॅमसंग व इसपन हे नामांकि इलेक्ट्रॉनिक कंपन्याचे पॅकिंगसाठीचे सुमारे पंचवीस कोटी रुपयाचे रिकामे बॉक्स गोदामात साठवून ठेवले होते. याठिकाणी अनधिकृतपने पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आल्याची खबर भिंवडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळाली. त्यांनी नारपोली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकून कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर कॉपीराईट अॅक्ट १९५७ चे कलम ५१ व कलम ६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कॉपीराईट अॅक्ट अन्वये करण्यात आलेली ही देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी परिषदेत दिली.