ठाणे - भिवंडी महापालिकेचा सन २०२१ - २२ या आर्थिक वर्षाचा ८१२ कोटी ६३ लाख २१ हजार रुपयांचा मूळ अर्थसंकल्पसह विशेष अर्थसंकल्पीय ऑनलाईन महासभेत पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी भिवंडी महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे सादर केला. विशेष म्हणजे यासोबतच महानगरपालिकेचा मागील वर्षाचा सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षाचा ६४० कोटी ८४ लाख ४० हजार रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प देखील मनपा आयुक्तांनी सादर केला आहे .
या अंदाजपत्रकात सन २०२०-२०२१ चा सुधारित तर २०२१ - २०२२ चा मूळ अर्थसंकल्प अ व क भागात तयार करण्यात आला आहे. अ भागात महसुली व भांडवली जमा खर्चाचा अर्थसहाय्याचे अनुषंगाने उर्वरित अर्थसंकल्पात म्हणजे क भागात पाणी पुरवठा व मलनिस्सारण तर पी अर्थसंकल्पात दुर्बल घटक, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन , महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण समिती, वृक्षसंवर्धन, शिक्षण विभाग, परिवहन विभाग अशा नऊ भागात हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे . सन २०२१-२२ या वर्षात महापालिकेला १०८९९ .६९ लाख उत्पन्न अपेक्षित असून एकूण उत्पन्न प्रारंभिक शिलेकेसह रक्कम रु.८१२ लाख ६३ लाख २१ हजार तर वर्ष अखेर रक्कम रु.६५ लाख ३८ हजार शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. क विभागात पाणी पुरवठा व मलनिस्सारण, शिक्षण विभाग, वृक्षसंवर्धन, अर्थसंकल्पाचे महसुली उत्पन्न कमी व खर्च जादा असल्याने अ अर्थसंकल्पातून पाणीपुरवठा विभाग करता ६३१०.५२ लाख, शिक्षण विभागाकरता ४७१०.३९, अग्निशमन विभागा करिता १२२०.७५ लाख वर्ग करण्यात येणार आहे.
विविध विकास कामांचा समावेश-
या अर्थसंकल्पात मार्केट बांधणे, पंतप्रधान आवास योजना, अटल आनंद घन वन प्रकल्प, शासनाने मंजुरी दिल्यास महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, विकास आकार निधीतून सिमेंट काँक्रीट रोड तयार करणे, जीआयएस मॅपिंग करणे, प्रसूतिगृह कार्यान्वित करणे, शाळा इमारत बांधणे तसेच या महानगरपालिकेचे महसुली उत्पन्न पाहता शासन निर्णयाप्रमाणे २ टक्के इतकी रक्कम म्हणजेच ७८८.१६ लाख इतकी तरतूद नगरसेवक निधी करता करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण, दुर्बल घटक, दिव्यांग कल्याण, या लेखाशीर्ष करता शासन निर्णयाप्रमाणे महापालिकेचा महसूल उत्पन्नातून बांधील खर्च वजा जाता उर्वरित उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम म्हणजेच १२६.५६ इतकी स्वतंत्ररीत्या तरतूद करण्यात आली आहे. सन २०२०- २१ सुधारित अंदाजपत्रक ६४० कोटी ८४ लाख ४०, तर २०२१- २२ रुपये ६५ लाख ३८ हजार शिल्लक दर्शवणारे असे ८१२ कोटी ६३ लाख २१ हजार रकमेचे मूळ अंदाजपत्रक महासभेत पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्याकडे सादर केला आहे. अंदाज पत्रक सादर झाल्यावर अर्थसंकल्पीय सभा गुरुवार १८ मार्च पर्यंत सभेचे कामकाज तहकूब करण्यात आल्याचे महापौर यांनी जाहीर केले असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा- Exclusive: डिसेंबर 2020 पासूनच सचिन वाझे वापरत होते मर्सिडीज कार