ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासून कोरोनाचा कहर पुन्हा वाढला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनासह महापालिका अधिकारी- कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला तिलांजली-
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या आठ दिवसापासून कोरोना रुग्ण संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन नको असेल, तर कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करा, असे आवाहण केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाचे गांभीर्य न घेता, सर्रासपणे मास्क न घालताच सार्वजनिक ठिकाणी शेकडो नागरिक वावरत आहेत. त्यामुळेच महापालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनही अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे.
दोन दिवसात पावणेदोन लाख रुपये दंड वसूल-
कल्याण-डोंबिवली शहरातील सर्वात अधीक गर्दीच्या आणि गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तसेच मुख्य बाजारपेठेत आज बाजारपेठ पोलिसांनी शेकडो बेजबाबदार नागरिकावर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. तसेच पुन्हा विना मास्क आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे विना मास्क दंड आकारण्यात आल्यामध्ये उच्चशिक्षित नागरिकांसह रिक्षा चालक, बस चालक, वाहन चालक आढळून आले आहेत. तर दोन दिवसात विना माक्स फिरणाऱ्या नागरिकांकडून पावणेदोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कल्याण मुंबई महापालिका क्षेत्रात आज 165 कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आतापर्यंत रुग्णांची संख्या 59 हजार 905 च्या घरात गेली आहे. तर आजही 1 हजार 284 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत अकराशेच्या वर रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- Corona Bulletin : राज्यातील कोरोना परिस्थितीचा वेगवान आढावा