ठाणे - बदलापूर रेल्वे स्थानकाच्या (पूर्व) परिसरात रहिवासी राहत असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर बँक ऑफ बडोदाच्या एका एटीएमला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीच्या घटनेमुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली होती.
अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत एटीएम जाळून खाक झाले होते.
वातानकुलीत यंत्रामुळे आग लागल्याची शक्यता
बदलापूर पूर्वेतील रेल्वे स्थानक रोड परिसरात एका निवासी इमारतीच्या तळमजल्यामध्ये एका गाळ्यात हे एटीएम आहे. रात्री उशिरा या एटीएमला अचानक आग लागल्याचे एका महिलेच्या निदर्शनास आले. तिने परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. नंतर अग्निशामक दलाला आगीची माहिती देताच काही वेळातच अग्निशामक दलाची १ गाडी घटनास्थळी दाखल होऊन अर्ध्यातासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. आग कशी लागली, हे अजूनही स्पष्ट झाले नसून एटीएममध्ये लावण्यात आलेल्या वातानकुलीत यंत्रामुळे ही आग लागल्याची शक्यता अग्निशामक अधिकाऱ्याने व्यक्त केली.