ठाणे - डॉक्टरांच्या सूचना पायदळी तुडवून कोरोना संशयित मृतदेहाला आंघोळ घालण्याचा प्रकार नातलगांच्या अंगलट आला आहे. मृत्यू पश्चात या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये मृतक व्यक्तीच्या 9 नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा 9 मे रोजी आजाने मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे बाकी होते. संशयित म्हणून तो मृतदेह शासकीय रुग्णालयाने पुर्णतः पॅक करुन ठेवला होता. मात्र आम्हाला मृतदेहावर अंतिम संस्कार करायचे आहेत, अशी नातलगांनी विनंती केली. यात कोरोनाची लक्षणे असून रिपोर्ट यायचा आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. नातलगांचा आग्रह वाढू लागताच मृतदेह उघडला जाणार नाही, याची दक्षता घेण्यास तयार असल्यास लिहून द्या, असे डॉक्टर म्हणाले. तेव्हा नातलगांनी तसे डॉक्टरांना लेखी स्वरूपात लिहून दिल्यावर मृतदेह घरी आणला. त्यानंतर डॉक्टरांच्या सूचना पायदळी तुडवत मृतदेह उघडून त्याला आंघोळ घातली. अंत्ययात्रेत 60 ते 70 जण सहभागी झाले. तीन दिवसांपूर्वी या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्या 25 ते 30 नातलगांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज त्यापैकी 9 नातलगांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नातलगांना भावनेच्या भरात आंघोळ घालण्याचा प्रकार अंगलट आला. त्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी होणारे नागरिकही धास्तावून गेले आहेत.
यासंदर्भात मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, मृतदेहाच्या घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल येणे बाकी असताना कोरोना प्रादुर्भाव नियमानुसार नातलगांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्यावर त्यांच्याकडे तो सोपवण्यात आला होता. मृतदेह उघडायचा नाही, आंघोळ घालायची नाही, अंत्ययात्रेत सोशल डिस्टनिंग ठेऊन 10 जणांच्यावर सहभागी व्हायचे नाही, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. दरम्यान, आज उल्हासनगरातील 11 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यात या 9 जणांचा समावेश आहे. त्यामुळे पॉझिटिव्हची आकडेवारी 92 च्या घरात गेली आहे. एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू पश्चात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मृतकांची संख्या 5 झाली आहे.