ठाणे - आज (रविवार) जागतिक योगा दिन आहे. हा योगा डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जात आहे. तसेच अनेक जगविख्यात लोक योगा करण्याचे धडे देत आहेत. अशातच प्रोजेरिया हा अतिशय दुर्मिळ असा आजार झालेला आदित्य साहू हा देखील सर्वांना योगा करण्याचे धडे देत आहे. इतका मोठा आजार होऊनही तो स्वतः योगा करतो. आजच्या योगा दिनाच्या दिवशी त्याने सर्वांना योगा करण्याचा संदेश दिला आहे.
आदित्य साहू हा मागील अनेक वर्षांपासून योग करत आहे. योगामुळे होणारे फायदे याचा प्रचार करत आहे. त्यांच्याकडे योगाचे शिक्षण घेण्यासाठी अनेक लोक येतात. आदित्यला जन्मतः या दुर्धर आजाराने ग्रासले आहे. या आजारात या रुग्णांचे आयुष्यमान देखील कमी असते. अशा रुग्णांना प्रोजेरिया रिसर्च फाउंडेशन मदत करते. संपूर्ण जगात ही एकमेव संस्था आहे जी या मुलांचे औषधोपचार अमेरिकेतील डॉक्टरांकडून मोफत करते. याच संस्थेशी आदित्य देखील निगडित आहे. तो सध्या केवळ 9 वर्षाचा आहे. या आजाराशी झुंजतोय. असे असूनही त्याने जगण्याची जिद्द सोडली नाही. स्वतःचे मन तो योगा करण्यात रमवतो. स्वतः योगा करून इतरांना देखील योगा करण्याचे धडे देतो. आजच्या योगा दिनाच्या निमित्ताने त्याने खास योगा करून दाखवले आहेत. तसेच सर्वांनी योगा करून स्वस्थ राहावे असा संदेश देखील दिला आहे.
योगाभ्यास हा आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतो. अध्यात्म आणि विज्ञान यांचा संतुलित संगम म्हणजेच योग. भारताने अवघ्या विश्वाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे योग! योग आणि योगाभ्यासाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करण्यासाठी २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
२७ सप्टेंबर २०१४मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना मांडली. यावेळी त्यांनी सांगितले, की योग हा केवळ एक व्यायामप्रकार नसून, आपल्या 'स्व'चा शोध घेण्याचा, मनः शांती प्राप्त करण्याचा आणि मानसिक व शारीरिक संतुलन राखण्याचा एक मार्ग आहे. त्यानंतर दरवर्षी २१ जूनला 'जागतिक योग दिन' साजरा करण्यात येतो.