नवी मुंबई - नवी मुंबई पाम बीच रोडवर काल रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारने धडक दिल्याने बाईकवर बसलेल्या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. अक्षय अनिल गमरे (27) व संकेत अनिल गमरे (29) अशी मृत भावांची नावे आहेत.
मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी येत असताना झाला अपघात-
मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी येत असतानाच दोन सख्खे भाऊ बसलेल्या मोटार सायकलला पाम बीच रोडवर मर्सिडीज कारने धडक दिली. यामध्ये मोटार सायकलवर बसलेल्या दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते नवी मुंबई वाशी येथे राहण्यास होते. त्यांचे वडील अनिल गमरे हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. दोन्ही मुलांच्या अकाली जाण्याने गमरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मर्सडीज चालकाचे कार सोडून पलायन-
अपघात झाल्यानंतर मर्सिडीज कार चालक कार सोडून पळून गेला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात चालकाच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. मर्सिडीज चालकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महाजन अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा- लाल किल्ला हिंसाचारातील आरोपी सुखदेव सिंग दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!