ठाणे - मध्य रेल्वेने ठाणे-वाशी-पनवेल मार्गावर १६ वातानुकूलित लोकल कालपासून प्रवाशाच्या सेवेत दाखल केल्या आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची घामाच्या धारापासून सुटका होऊन प्रवास सुखकारक होणार आहे. तर मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीटांची आजपासून पुन्हा विक्री सुरू केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
एसओपींचे पालन करण्याचे रेल्वेकडून आवाहन -
ठाणे-वाशी-पनवेल मार्गावर सोमवार ते शुक्रवारपर्यंत वातानुकूलित लोकल धावणार आहेत. तर शनिवारी नॉन-एसी (गैर-वातानुकूलित) चालविण्यात येणार आहे. मात्र, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी TNU 65 ठाणे-नेरुळ आणि TNU 66 नेरुळ-ठाणे वगळता इतर स्थनाकात एसी लोकलची सेवा नसणार आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार नेहमीप्रमाणे इतर लोकल प्रवास सुरु राहणार आहे. मध्य रेल्वे आता एकूण १७७४ सेवांपैकी १७०२ म्हणजेच ९५.९४% लोकल सेवा रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच या उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना स्थानकात व प्रवासादरम्यान कोविडच्या संबंधित सर्व नियमांचे तसेच एसओपीचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनकडून करण्यात आले.
प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू -
मध्य रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या मुहूर्तांमुळे आजपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्म आणि स्टेशन तसेच टर्मिनसवर जास्त गर्दी रोखण्यासाठी वर नमूद केलेल्या स्थानकांवर ५० रुपये प्रमाणे प्लॅटफॉर्म तिकीट विक्री केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.