ठाणे - दोन दिवसांपूर्वी शहापूर तालुक्यातील किन्हवली मार्गावर एका निलगायीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगावजवळ आज पहाटे रस्ता ओलांडताना एका नर बिबट्याचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ठोस पावले उचलण्याची आवश्यकता
या घटनांमुळे दिवसेंदिवस वन्यजीवांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वनविभाग व वन्यजीव विभागाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
अडीच वर्षांचा होता बिबट्या
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगावजवळ पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने अडीच वर्षांच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती वाहतूक पोलिसांनी वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची दिली. घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक वसंत घुले, सहायक वनसंरक्षक आर. एच. पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वन परिमंडळ अधिकारी सुनील भोंडीवले व पथक घटनास्थळी दाखल झाले.
बिबट्याचे शवविच्छेदन विल्हेवाट
वनविभागाने घटनेचा पंचनामा करून मृत बिबट्याचे शव आसनगाव येथील काष्ठ विक्री आगारात आणण्यात आले. त्यांनतर शहापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सरोदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह वन्यजीव विभागाचे अधिकारी दर्शन ठाकूर आदींच्या उपस्थितीत बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.