ठाणे - महापालिकेत आतापर्यंत दहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र प्रशासनाच्या कामात सातत्य ठेवण्यासाठी महानगरपालिकेचे हजारो कर्मचारी या परिस्थित देखील कामावर आहेत.
ठाण्यात 365 पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. यातील 80 टक्के बाधित कर्मचारी उपचार पूर्ण करून पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. यातच प्रवीण वीर यांचा समावेश आहे. ते पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागात लिपीक पदावर कार्यरत आहेत.
ठाणे महानगरपालिका मागील काही महिन्यापासून वाढत्या कोणाच्या प्रादुर्भावामुळे सतत चर्चेत आहे. 2-3 वेळा लॉकडाऊन वाढवण्यात देखील आले. एकीकडे वाढणारे रुग्ण तर दुसरीकडे कमी पडणारे मनुष्यबळ अशा दुहेरी संकटात महानगरपालिकेच्या आयुक्तांची देखील बदली झाली. अशा वातावरणात काम करत असताना महानगरपालिकेचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.
याच योद्ध्यांमध्ये प्रवीण वीर हे देखील आहेत. त्यांना कोरोनाची बाधा झाली; आणि सतरा दिवसांच्या होम क्वारंन्टाइननंतर ते अखेर कामावर परतले आहेत. सततचा येणाऱ्या जनसंपर्कामुळे त्यांना बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेळेवर औषधोपचार आणि आयुर्वेदिक पदार्थांमुळे या आजारातून दहा दिवसांमध्ये बरे झाल्याचे त्यांनी सांगितले. आता ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.
ठाणे मनपा 'हॉट'सीटवर
ठाणे महापालिकेत आतापर्यंत 365 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 10 पालिका कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एकट्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये 150 डॉक्टर्स, नर्सेसला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र यातील 80 टक्के रुग्ण बरे झाले असले, तरीही दररोज 2 ते 2 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मृत पालिका कर्मचाऱ्यांमध्ये घनकचरा विभाग 2 ,कर विभाग 1,स्थावर मालमत्ता विभाग 1 ,परिवहन सेवा 1 ,शहर विकास विभाग 1, तसेच 4 अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.