ठाणे - गेल्या 30 वर्षापासून अखंडितपणे सुरू असलेली आणि देशभरातील खेळाडूंचे आकर्षण ठरलेली ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी आज (सोमवार) याबाबतची घोषणा केली.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही देशभरात नावलौकिक प्राप्त झालेली मॅरेथॉन असून, आजपर्यंत अनेक नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेत आपली हजेरी लावलेली आहे. दरवर्षी 25 ते 30 हजार स्पर्धक यात सहभागी होत असतात. दरवर्षी, पावसाळ्यात होणारी ही मॅरेथॉन खेळाडूंचे खास आकर्षण तर असतेच शिवाय ठाणे शहरातील अनेक सामाजिक घटक, विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, क्रीडाप्रेमी, सिनेकलावंत या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे शहर मॅरेथॉनमय होऊन जाते असे चित्र दरवर्षी असते.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनसाठी स्पर्धकांची नोंदणी, विविध विभागाच्या बैठका, तसेच कार्यक्रमाची पूर्वतयारीचे काम हे मॅरेथॉनच्या दोन महिने आधी सुरू होते. तसेच या सर्व तयारीसाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत असते. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्यादृष्टीने अनेक गोष्टींना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे यंदा ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन घेणे शक्य नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
दरवर्षी, सुमारे 30 हजारांहून अधिक स्पर्धक हे राज्यातून ठाण्यात दाखल होत असतात. परंतु, यंदा त्यांना स्पर्धेपर्यंत पोहोचणे शक्य नाही. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग राखणे देखील शक्य नाही. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत असल्यामुळे ही स्पर्धा आरोग्याच्या दृष्टीने घेणे योग्य नसल्यामुळे रद्द करावी लागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे ठाणे जिल्हा आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. मात्र, यंदा शैक्षणिक वर्ष देखील अद्याप सुरू झालेलं नाही. एकूणच सध्याची परिस्थिती पाहता, 31 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करण्यात आली असल्याचे, महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.