सोलापूर अस्थी विसर्जनासाठी गेलेला तरुण सीना नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.सोलापूर शहरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या किशोर डिगाजी व्हटकर(वय 27 वर्ष) यांच्या काकांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. आपल्या काकांच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील सीना नदीच्या बंधाऱ्यावर सोमवारी सायंकाळी किशोर गेला होता. त्यांच्यासोबत कुटुंबीय आणि नातेवाईक देखील होते. यावेळी अस्थीचे विसर्जन करताना किशोर व्हटकर या तरुणाचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. नदीचा प्रवाह अधिक असल्याने नदी पात्रात कुटुंबियांसमोर किशोर वाहून गेला होता. 31 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू टिमला त्याच मृतदेह सापडला.
किशोरला वाचवण्याचा प्रयत्न केला पण हात निसटला नदीच्या वाहत्या पाण्यात पडलेल्या किशोरच्या मदतीसाठी नातेवाईक पुढे धावले होते. त्याच्या आधारासाठी दोघांनी हात दिला होता पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हात निसटल्यामुले ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला होता. पाण्याच्या प्रवाहात पडलेल्या किशोरला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो पाण्याबरोबर वाहत गेला होता. किनाऱ्यावर नातेवाईक असून देखील त्यांना काही करता आले नाही. नातेवाईकांनी प्रचंड आरडाओरडा केला पण त्याने काहीच झाले नाही. सत्तावीस वर्षांचा तरुण नातेवाईकांच्या डोळ्यादेखत नदीच्या पाण्यात वाहून गेला.
बघता बघता किशोर नाहीसा झाला होता वाळूच्या उपशामुळे नदीत जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत.या मोठ्या खड्ड्यामुळे किशोर काही क्षणात नाहीसा झाला आणि तो पाण्यात बुडाला. सीना नदीच्या काठावर सोमवारी सायंकाळी एकच गोंधळ उडाला होता. परिसरातील नागरिकांनी देखील येथे गर्दी केली. किशोरला वाचविण्यासाठी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती देण्यात आली होती.
किशोरचा भरपूर शोध घेतला किशोरचा शोध घेण्याचा भरपूर प्रयत्न अग्निशमन दलाने केला होता. पण किशोरचा ठावठिकाणा लागत नव्हता. जवळपास तीन तास शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु किशोर सापडू शकला नाही. अखेर शोध मोहीम देखील थांबली आणि किशोर डोळ्यादेखत सीना नदीच्या पात्रात अदृश्य झाला. आपल्या काकांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी नदीवर आलेल्या किशोरला सीना नदीने गिळंकृत केले होते.
मंगळवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला मंगळवारी दिवसभर अग्निशमन दल किशोर व्हटकर या तरुणाचा सीना नदी पत्रात शोध घेत होते. मंगळवारी सायंकाळी नदीतील एका खड्ड्यात त्याचा मृतदेह आढळला. मृतदेह ताबडतोब बाहेर काढून तालुका पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाणे(सोलापूर ग्रामीण) येथे झाली आहे.