सोलापूर - अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात उद्रेक पाहावयास मिळत आहे. ठिकठिकाणी आंदोलकांकडून जाळपोळ, तोडफोड व दगडफेक करून तरुणांकडून उग्रस्वरूपात आंदोलने सुरु आहेत. सोलापुरात देखील आज ( शनिवारी 18 जून ) रोजी शेकडो विद्यार्थी रेल्वे स्थानकावर जमले होते. पण, सोलापूर शहर पोलिसांनी ताबडतोब रेल्वे स्टेशन येथे येऊन सर्व जणांना ताब्यात घेतले. त्यांची समजूत काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या, कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका, अशा सूचना केल्या. शेकडो विद्यार्थी व तरुण अचानकपणे सोलापूर रेल्वे स्थानकावर जमले आणि पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली ( youth protest against agneepath scheme in solapur )होती.
सोशल मीडियावर आवाहन करुन जमले तरुण - लष्करभरती आणि पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना सोशल मीडियावर आवाहन केले होते. अग्निपथ नावाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून जवळपास 200 तरुणांना सोशल मीडियावर शनिवारी सोलापूर रेल्वे स्थानकावर जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरुण मोठ्या संख्येने सोलापूर रेल्वे स्थानकावर जमल्याने आरपीएफ जवानांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब सोलापूर लोहमार्ग पोलीस आणि सदर बाजार पोलिसांना याबाबत माहिती दिली.
सर्व तरुणांची रेल्वे स्थानकावरून धरपकड - लष्कर भरती आणि पोलीस भरतीसाठी जमलेल्या तरूणांना ताबडतोब सदर बाजार पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. रेल्वे स्थानकावर एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सर्व जणांना ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात आणले. त्यांची समजूत काढत त्यांना निवेदन द्या, सरकार पर्यंत म्हणणे सादर करू, असे आश्वासन दिले.
गुन्हे दाखल केले नाही - सर्व तरुण लष्कर भरती आणि पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. त्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार केला नाही. त्याठिकाणी जमा होऊन ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार होते. पण, सोलापूर पोलिसांनी ताबडतोब सर्व जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे एकावरही गुन्हा दाखल केला नाही. उलट पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पीएसआय सचिन माळी, पीएसआय बेंबडे व सदर बाजार पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व जणांची समजूत घातली.
हेही वाचा - Anti Agnipath Protest : अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात उद्रेक, ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड आंदोलने