सोलापूर - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी (दि. 20) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत महिलांना मोफत लाकूड वाटप करण्यात आली. केंद्र सरकारचा निषेध करत इंधन दरवाढीचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडरचा दर वाढल्याने सर्वसामान्यांचा आर्थिक बजेट कोलमडत आहे. यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांना गॅस बंद करा चूल पेटवा, असे म्हणाून लाकूड वाटप केले. सोलापूर शहर पोलिसांनी आंदोलन नियंत्रणात आणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
घरगुती गॅस दरवाढमुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले
मागील काही दिवसांपासून देशात घरगुती वापराचे गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गॅस दरवाढीमुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ महिलांवर आली आहे. 375 रुपयांचे गॅस आता 1 हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. दिवाळीच्या तोंडावर महागाईचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
आंदोलनाला आलेल्या महिलांना पोलिसांचा धाक
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत काही महिला आंदोलनासाठी बोलावल्या होत्या. पण, पोलिसांनी सूचना दिल्यामुळे अचानकपणे आंदोलनाची रूपरेषा बदलावी लागली. त्यानुसार महिलांना थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाण्यास सांगितले. पण, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. आंदोलनाला आलेल्या सर्व महिलांना बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेण्याची किंवा कारवाई करण्याची भीती दाखवली. यामुळे आल्या पावलांनी महिला आंदोलक परत गेले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष जुबेर बागवान यांनी यावर तीव्र शब्दात पोलिसांचा निषेध केला. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना बोलावून लाकूड मोफत देण्यात आले. केंद्र सरकारच्या महागाई धोरणामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे, असा संदेश दिला.
सदर बाजार पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले ताब्यात
भाजप सरकारने किंवा मोदी सरकारने ठोस पाउले न उचलल्यास राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र जनआंदोलन उभे करणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली. यावेळी प्रशांत बाबर, चेतन गायकवाड, विक्रांत खुणेकर, संपन्न दिवाकर, दीपक देवकुळे, जहीर गोलंदाज, विजय माने, विवेक फुटाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यकाच्या आंदोलनास अनेकांची दांडी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर बागवान हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असतात व निदर्शने करतात. पण, बागवान यांनी बुधवारी पुकारलेल्या या आंदोलनाला अनेक नेत्यांची अनुपस्थिती होती. शहरातील विजापूर वेस ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर लाकूड वाटप करत आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी दांडी मारली होती.
हेही वाचा - कोट्यावधी रुपयांचे बनावट डिझेल विक्री, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक