सोलापूर - घरा शेजारी राहणाऱ्याच एका तरुणाने घरफोडी करून 2 लाख 55 हजार 500 रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केल्याचा प्रकाराचा पोलिसांना छडा लावला आहे. जेलरोड पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने चोरी झाल्यापासून 48 तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला आहे. महंमद हनिफ कुरेशी यांच्या घरात ही चोरी झाली होती. तर या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे खिजर जफर चौधरी(वय 21,रा अफना अपार्टमेंट,न्यू पाच्छा पेठ,सोलापूर) असे आहे.
शेजाऱ्याच्या वागणुकीत बदल-
जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू पाच्छा येथील अफना अपार्टमेंट मधील पाचव्या मजल्यावर 10 नोव्हेंबरला घरफोडी झाली होती. यामध्ये एकूण 2 लाख 55 हजार 500 रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला होता. ही घरफोडी भर दिवसा झाली होती. याबाबत 10 नोव्हेंबरला रात्री उशिरा जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत महंमद हनिफ कुरेशी यांनी तक्रार दिली होती. कुरेशी यांच्या घरातील सदस्य रुग्णालयात अॅडमिट होते. त्यामुळे कुरेशी हे घराला कुलूप लावून रुग्णाकडे गेले होते. त्यानंतर माघारी परतले असता त्याच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.
याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यामध्ये अपार्टमेंटमधील घरफोडी कुरेशी यांच्या घरा शेजारच्या तरुणाच्या वागणुकी झालेला बदल पोलिसांना जाणवत होता. खिजर चौधरी असे त्या शेजाऱ्याचे नाव आहे. हा तरुण महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पोलिसांनी त्याला विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. त्यावेळी खिजर चौधरी हा उडवा उडवीची उत्तरे देत होता. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच संशयित खिरजीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याकडून सर्व मुद्देमाल किंवा सोन्या चांदीचा ऐवज हस्तगत केला आहे.