सोलापूर - वंचित बहुजन आघाडीकडून महावितरण कार्यालयासमोर वीज बिल परत घ्या, वीज बिल माफ करा, अशा जोरदार घोषणा देत वीज बिलांची होळी करण्यात आली. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुरारजी पेठ येथील महावीतरणाच्या मुख्य कार्यालय समोर आंदोलन झाले. पोलिसांनी वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना ताबडतोब ताब्यात घेत कारवाई केली.
सोलापूर शहरात एकूण 2 लाख 7 हजार वीज ग्राहक आहेत. कोरोना महामारीच्या अनुषंगाने सोलापूर सह देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यामुळे हातावर पोट असणारे कामगार, छोटे-मोठे व्यवसाय करणारे ,धुणी भांडी करून उपजीविका करणारे महिला, बांधकाम क्षेत्रातील कामगार, ऑटो रिक्षा चालक, हॉटेलमध्ये काम करणारे वेटर, वस्ताद, रस्त्यावर बसून भाजी व फळे विकणारे महिला, यांची लॉकडाऊनमध्ये मोठी फरफट झाली आहे. गेले सहा महिन्यांत लॉकडाऊनमुळे जनजीवन कोलमडले आहे. या लॉकडाऊनमुळे या व्यावसायिक व कामगारांजवळ एक पै देखील शिल्लक राहिली नाही. ही लोकं कर्जबाजारी झाली आहेत. लाईट बिले भरण्यासाठी सक्षम नाहीत.
अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्या पासून भली मोठी आकारणीची लाईट बिले येऊ लागली आहेत. कर्जबाजारी झालेल्या शहरातील नागरिकांना घर चालविणे किंवा प्रपंच चालविणे अवघड झाले आहे. जगायचे की मरायचे असा प्रश्न पडला आहे. त्यातच आणखी भर म्हणून अव्वाच्या सव्वा रकमेची लाईट बिले आली आहेत. ही लाईट बिले परत घ्या, वीज बिल माफ करा असा नारा देत वंचितच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून निषेध व्यक्त केला.
यावेळी वंचितचे आनंद चंदनशीवे, अंजना गायकवाड, गणेश पुजारी, ज्योती बनसोडे, रेश्मा मुल्ला, बबन शिंदे आदींची उपस्थिती होती. महावितरण कार्यालयासमोरून फौजदार चावडी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना ताब्यात घेत कारवाई केली.