सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन २१-२२ चे सुधारीत तर २२-२३ च्या २७१.९४ कोटी रुपयांच्या मुळ अंदाजपत्रकाला शुक्रवारी आधिसभेच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी अधिसभेची बैठक पार पडली. गेल्यावेळी हा अर्थसंकल्प नामंजूर करण्यात आला होता. विद्यार्थी हित समोर करत सिनेट सदस्यांनी हे बजेट नामंजूर केले होते. अंदाजपत्रक नाकारण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती.
सोलापूर विद्यापीठाबाबतीत राज्यपालांपर्यंत गेल्या तक्रारी - कुलगुरु विरुद्ध डॉ. बी. पी. रोंगे आणि अन्य यांच्यातील वाद- विवाद पुढे आला होता. राज्यपालांपर्यंत या विषयीची तक्रार गेली होती. यानंतर समन्वयाचे प्रयत्नही झाले होते. अखेर आजच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याविषयी डॉ. बी. पी. रोंगे, राजाभाऊ सरवदे यांच्यासह अन्य सदस्यांनी सहमती देत काही दुरुस्त्याही सुचविल्या, त्यावरही चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रकाला दुरुस्तीसह मान्यता देत असल्याचे राजाभाऊ सरवदे यांनी सांगितले. इतर सदस्यांना तशी विनंती केली. डॉ. हनुमंत अवताडे यांनी यास अनुमोदन दिले आणि अडलेला अर्थसंकल्प अखेर मंजूर झाला आहे.
अधिसभेच्या बैठकीत सर्व सदस्यांनी दिली मान्यता - अंदाजपत्रकात विद्यार्थी व विद्यापीठाच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शहा यांनी सदस्यांनी मांडलेल्या योग्य व समर्पक सूचनांचा समावेश करून 2021-22 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2022 - 23 चे मूळ अंदाजपत्रक सादर केले. यावेळी सदस्य डॉ. मधुकर देशमुख यांनी बजेट सर्वसमावेशक झाल्याचे सांगून सर्व सदस्यांनी मंजुरी देण्याची विनंती केली. सदस्य प्राचार्य डॉ. संतोष कोटी, डॉ. माया पाटील, डॉ. गौतम कांबळे, डॉ. भारती रेवडकर, बार्शीचे पी. डी. पाटील, डॉ. गुणवंत सरवदे, डॉ. गजानन धरणे, डॉ. आर. एस. मेंते, डॉ. सचिन लड्डा, डॉ. सुग्रीव गोरे, सचिन गायकवाड, डॉ. चंद्रकांत चव्हाण आदींनी आपले मत व्यक्त करत मान्यता दर्शविली. सर्व सदस्यांकडून डॉ. हनुमंत आवताडे यांनी अंदाजपत्रकाला मंजुरीसाठी अनुमोदन असल्याचे जाहीर केले.