सोलापूर - गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर चूल मांडून अनोखे आंदोलन करीत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने चुकीचे निर्णय घेत आहे, नोटाबंदी, शेतकरी विरोधी कृषी विधेयक, किंवा गॅस दरवाढ यासारखे अनेक चुकीचे निर्णय घेत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे या विरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीने हे आंदोलन करून गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.
पन्नास रुपयांची दरवाढ
कोरोनाकाळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आजही अनेकांना रोजगार मिळणे अवघड झाले आहे. परंतु केंद्रातील मोदी सरकार सातत्याने दरवाढ करीत आहे. आता गॅस दरामध्ये 50 रुपयांची दरवाढ करून सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना वेठीस धरले आहे.
राज्य सरकारकडून धान्य उपलब्ध
राज्य सरकार सर्वसामान्यांसाठी स्वस्तात धान्य देत आहे. परंतु हे धान्य शिजवून खाण्यासाठी लोकांकडे गॅस उपलब्ध नाही. कारण मोदी सरकारने केलेली गॅस दरवाढ परवडणारी नाही. यावेळी आंदोलनातपश्चिम महाराष्ट्र निरीक्षक भारती शेवाळे, शहर अध्यक्षा सुनीता रोटे, लता ढेरे, संतोष पवार, बसू कोळी, झुबेर बागवान, दादाराव रोटे, अंजली जाधव, शोभा सोनवणे, वंदना भिसे, उषा बेसरे, आफ्रिन पटेल, नासीमा शेतसंदी आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.