सोलापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नाही. मात्र जनजीवन सुरळीत होण्यासाठी अनलॉक केलेल्या सोलापुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील मधोमध असलेल्या मधला मारुती चौकातील भर बाजारातुन चोरट्याने एका प्रवाशाची दीड लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी लंपास केली आहे. तर विजापुर रोड वर मोबाईल वर बोलत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंळसूत्र हिसका मारून लंपास केले आहे.सोलापुरात चैन स्नॅचिंग, घरफोड्या, लूट, बॅग चोरी असे गुन्हे वाढले आहेत.
वसंत तात्या पवार( वय 52,रा बेगमपूर,ता मोहोळ, सोलापूर) हे शनिवारी सोलापुरात आले होते. शहरातील मुख्य चौक व मुख्य बाजारपेठ असलेल्या मधला मारुती येथे शनिवारी दुपारी 3 ते 3.30 दरम्यान फुलां
च्या दुकानात हार घेत होते. त्यांच्या जवळ 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग होती. हाराच्या दुकानात गर्दी अधिक होती. अज्ञात चोरट्याने या गर्दीचा फायदा घेत रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. बॅग मध्ये दोन बँकांचे पास बुक देखील होते. एवढी मोठी रक्कम भर बाजारातून लंपास झाल्याने खळबळ उडाली आहे. रात्री दहा वाजेपर्यंत जेलरोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लिगाडे करत आहेत.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
विजापूर रोडवर थांबून फोनवर बोलत असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना नंडगिरी पेट्रोल पंप येथे शुक्रवार दि.३० जुलै रोजी घडली. पद्मावती महादेव पाटील ( वय - ३० रा.नम्रता सोसायटी,नडगिरी पेट्रोल पंप,विजापूर रोड,सोलापूर) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत होत्या. त्यावेळी दोघा अनोळखी व्यक्तींपैकी एकाने पाठीमागुन पळत येऊन पद्मावती पाटील यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकाऊन चोरून नेले. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून,दोघा अनोळखी इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोह.खांडेकर हे करीत आहेत.
जसजसे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे, तसे चोरांनी देखील आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. तबबल 4 महिन्याच्या लॉकडाऊन नन्तर चोऱ्या, घरफोड्या, चैन स्नाचिंग,लूट वाढले आहेत. विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद होत आहेत. या वाढत्या गुन्हेगारी मुळे सोलापूरकर भीतीच्या सवटामध्ये आहेत.