सोलापूर - शहरातून काम आटोपून स्वत:च्या दुचाकीवरुन आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे गावी निघालेल्या भिमाशंकर बाबुराव विधाते (वय 55) यांना वाटेतच ट्रकने चिरडले. होटगी रोडवरील सिध्देश्वर साखर कारखान्याजवळ ट्रकने धडक दिल्यानंतर विधाते यांच्या डोक्या वरून चाक गेल्याने जबर मार लागला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेले विधाते यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली. अपघातामधील दुचाकी स्वार भिमाशंकर विधाते यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
अपघातात विधाते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर त्यांच्या खांद्याला व हातालाही मार लागला होता. त्या परिसरातील गतिरोधकजवळ आल्यानंतर दुचाकीचा वेग कमी केल्यानंतर मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याची चर्चा परिसरात होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पीएसआय पेठकर हे पुढील तपास करत आहे. विधाते यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचेही एमआयडीसी पोलिसांकडून सांगण्यात आले. भीमाशंकर विधाते यासोबत असलेल्या व्यक्तीला किरकोळ प्रमाणात मार लागला आहे. त्यांवर देखील उपचार सुरू आहे. मृत विधाते यांचा मुलगा मुंबई येथे पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहे. दुसरा मुलगा जिल्हा परिषद येथे नोकरीस आहे. एक मुलगी असून ती विवाहित आहे.