सोलापूर - शहर हद्दीत हैदराबाद महामार्गावरील कोरोना तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या चौकीला एक ट्रकने उडवल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौकीत त्यावेळी शिक्षक व पोलीस कार्यरत होते. सुदैवाने ते बचावले आहेत.
सोमवारी रात्री सोलापूर-हैदराबाद महामार्गावर चार शिक्षक व पाच पोलीस कर्मचारी रात्री 2 वाजे पर्यंत होमक्वारंटाइन प्रक्रियेचे काम करत होते. वर्दळ कमी होताच सर्वजण गप्पा मारत बसले होते. पहाटे तीन वाजता एक माल वाहतूक जीप सुरक्षा बॅरिकेटला धडकली. पावसाची रिपरिप सुरू असल्याने ती जीप अनियंत्रित झाल्याचे जीपचालकाने सांगितले. यात कोणाला काहीही इजा झाली नाही. मात्र, या किरकोळ अपघातानंतर आज पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी एक ट्रक (डंपर) ताशी 60 पेक्षा जास्त वेगाने नियंत्रण गमावून सर्व सुरक्षारक्षणासाठी असलेल्या चौकीकडे आला.
सुरक्षा सिमेंट गार्डला टायर घासत आगीच्या ठिणग्या उडवित ट्रक चाल करून येत असताना झालेल्या आवाजामुळे दक्ष झालेल्या सर्व तपासणी कर्मचाऱ्यांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली, आणि सुदैवाने जीवितहानी टळली. अवघ्या पाच ते सहा सेकंदाचा हा प्रसंगाने सर्वांसाठी भीतीने थरकाप उडवणारा ठरला. अनियंत्रित ट्रक पुढे 200 फुटावर जाऊन थांबला होता. त्यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कारवाई केली.
या अपघातात मोठा अनर्थ झाला असता. पण काळ आला होता पण वेळ नाही, अशी घटना हैदराबाद नाक्यावर घडली. सुदैवाने सर्व शिक्षक व पोलीस कर्मचारी वाचले. दुर्दैवाने अपघात झाला असता तर पोलिसांच्या कुटुंबीयांना विमा फंडातून नुकसानभरपाई मिळाली असती. पण शिक्षकांच्या कुटुंबीयांना काय असा प्रश्न पडला आहे.
शिक्षकांना विमा कवच नाहीच -
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शिक्षक देखील पोलीस व आरोग्य कर्मचारी सोबत कोरोना योद्धाची भूमिका पार पाडित आहे. पोलिसांसोबत अनेक शिक्षक महामार्गावरील चेकपोस्टवर दिवासरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, या महामारीच्या काळात शिक्षकांना जीवन सुरक्षा म्हणून साधा विमा देखील उतरवला नसल्याचे वास्तव या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे.
राज्यभरातील सर्व शाळांना सध्या लॉकच आहे. त्यामुळे शासनाने अनेक शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली आहे. कोरोना महामारी विरुद्ध पोलीस, आरोग्य कर्मचारी व शिक्षक लढा देत आहेत. राज्य शासनाने पोलिसांना व आरोग्य कर्मचाऱ्यांनार विमा कवच लागू केले आहे. पण शिक्षकांना कोणतीही आरोग्य विमा सुरक्षा कवच योजना लागू केली नसल्याची माहिती सोमवारी झालेल्या अपघातामधून बचावलेल्या एका शिक्षकाने दिली. त्यामुळे या महामारीमध्ये एखाद्या शिक्षकास कोरोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाल्यास त्याला त्याचा मोबदला मिळणार का? किंवा कोरोना ड्युटी बजावत असताना एखाद्या वाहनाच्या अपघातात त्या शिक्षकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना व वारसांना शासनाकडून मदत मिळणार का? असे प्रश्न पडत आहेत.
कोरोना महामारीच्या या लढ्यात जवळपास नवीन पेन्शन धारक व 20 टक्के पगारावर काम करणारे शिक्षक अधिक आहेत. मात्र, अशा वाईट प्रसंगामुळे त्यांचे परिवार क्षणात उघड्यावर पडु शकतात.