सोलापूर - सावळेश्वर टोल नाक्यावर गॅसचा टँकर चालला होता. अचानकपणे टँकर चालकाला भोवळ किंवा चक्कर आली आणि बेशुद्ध झाला. टँकर तसाच महामार्गावर चालला होता. येथील ट्रॅफिक पोलिसाच्या हे लक्षात येताच त्याने आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने धावत्या गॅस टँकरच्या केबिनमध्ये चढून टँकर रोखला. यामुळे भरलेला गॅस टँकर अपघात होऊन स्फोट होण्यापूर्वीच थांबला.
या घटनेची सविस्तर माहिती अशी, की सोलापूर विभागातील महामार्ग पोलीस विभागात कार्यरत असलेले पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले हे शुक्रवारी सावळेश्वर टोल नाक्यावर आपली ड्युटी बजावत होते. वाहने चेक करत होते. त्यावेळी सोलापूर पुणे राष्ट्रीय मार्गावरून गॅसचा टॅंकर वेडीवाकडी हेलकावे खात येत असल्याचे दिसून आले. त्याला अधिक बारकाईने व निरीक्षण करून पाहिले असता टॅंकर चालक ड्रायव्हच्या सीटवर निपचित पडला होता.
टॅंकर हेलकावे खात तसेच पुढे जात होता. संजय चौगुले या ट्रॅफिक हवालदाराने यांनी ताबडतोब धावत टॅंकरचा पाठलाग केला आणि टॅंकरमध्ये द्रायव्हर केबिन मध्ये चढून टॅंकर रोखला. ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणले. त्याची विचारपूस केली असता, त्याला काहीच माहिती नव्हते. मग त्या टॅंकर चालकाला पाणी पाजून थोडी विश्रांती करा, असा सल्ला देत दुसऱ्या चालकाला बोलावून टॅंकर रवाना केले.
ट्रॅफिक पोलिसाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली.