सोलापूर - मार्केट यार्ड ते वसंत विहार या रस्त्यावर अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून मयूर बागल(वय 39) यांच्याकडील 4 लाख 80 हजारांची रक्कम लंपास केली आहे. या प्रकरणी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करत आहेत.
मयूर बागल यांचे सोलापूर मार्केट यार्डात धान्याचे दुकान आहे. दुकानातील व्यवहार आटोपून मंगळवारी रात्री घरी जात असताना दोन दरोडेखोरांनी अपघाताचा बनाव करून त्यांना थांबवले. यानंतर बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील 4 लाख 80 हजार रुपयांची रोकड पळवली. या धाडसी चोरीमुळे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सणासुदीमुळे दुकानात व बाजारपेठेत गर्दी आहे. लॉकडाऊननंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दिवाळई तोंडावर असल्याने बाजारात वर्दळ वाढली आहे. मंगळवारी दिवसभर मार्केट यार्डात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. रोज लाखो रुपयांची उलाढाल बागल ट्रेडर्स या दुकानात होते. ग्राहकांच्या गर्दीमुळे मंगळवारी रात्री घरी जाण्यासाठी बागल यांना उशीर झाला होता. रात्री 9 च्या सुमारास दिवसभर कमावलेली रक्कम घेऊन ते घरी निघाले होते.
अपघाताचा बनाव... साधला डाव!
वसंत विहारला जाण्यासाठी त्यांनी महामार्गाचा रस्ता धरला होता. काही अंतरावर गेल्यावर मयूर यांच्या चारचाकी वाहनाला एका दुचाकी स्वराने स्वतः धक्का दिला. दुचाकीवर बसलेल्या एका हेल्मेट धारकाने मयूर यांच्या वाहनाजवळ येऊन बंदुकीचा धाक दाखवला.
अपघाताचा बनाव करून दोन्ही दुचाकीस्वारांनी वाहनाची काच फोडली आणि पैशांची बॅग घेऊन पसार झाले. मयूर बागल यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. काही मिनिटांत पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. परंतु तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.