सोलापूर - पुण्याहून हुबळीकडे निघालेल्या चारचाकी वाहनाचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी (दि. 25 एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चार जण जखमी झाले असून जखमींवर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सचिन अण्णासाहेब शितोळे (वय 35 वर्षे), दिलीप जाधव (वय 37 वर्षे), सोनाबाई जाधव (वय 55 वर्ष), लाडू दिलीप जाधव (वय 1 वर्ष), गौरी दिलीप जाधव (वय 7 वर्षे, सर्व रा. हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक), अशी मृतांची नावे आहेत. तर वर्षा सचिन शितोळे, रेखा दिलीप जाधव, इशा जाधव आणि विनायक बसवराज दरेकर, असे जखमींची नावे असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की, पुण्याहून हुबळीकडे भरधाव वेगाने चारचाकी जात होती. सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व उभ्या असलेल्या ट्रकला चारचाकीने पाठीमागून धडक दिली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.