सोलापूर - केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये शेतकरी विषयक तीन कायदे पारित केले. त्या विरोधात शेतकरी संघटनानी आक्रमक होत केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचा वणवा पेटवला आहे. सोलापुरातील शेतकरी संघटना आणि इतर संघटनानी देखील या आंदोलनाला स्थानिक पातळीवर पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाघ्या मुरळीचे लोकसंगीत सादर करत गुरुवारी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जागर आंदोलन केले.
सप्टेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारने तीन कृषी विषयक कायदे मंजूर केले. यामध्ये कॉर्पोरेट कंपन्याना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. कृषी उत्पादक आणि ग्राहक यामध्ये कार्पोरेट कंपन्या येऊन मोठा नफा कमवतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणून शेतकरी याला विरोध करत आहेत.
हे आंदोलन संपूर्ण देशाचे
हे आंदोलन फक्त पंजाब आणि हरयाणा येथील शेतकऱ्यांचे नसून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे आहे, असे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजपशासित राज्य शासनाकडून दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र हा अन्याय असल्याचे शेतकरी म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोध
हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून शिखांचे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. शेतकरी आंदोलनाला शिखांचे आंदोलन म्हटल्याने शेतकरी संघटना याचा तीव्र निषेध करत असल्याचे स्वाभिमानीतर्फे सांगण्यात आले.
सोलापुरातील आंदोलनाला पोलीस परवानगी नव्हती
सोलापूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जागर आंदोलनाला पोलीस परवानगी देण्यात आली नव्हती. तरी देखील हे आंदोलन आयोजित केले होते. सदर बझार पोलिसांनी याबाबत वेळोवेळी सूचना देऊन देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाघ्या मुरळीचे लोकगीत किंवा लोकसंगीत सादर करत दिल्लीत होत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा जाहिर केला. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन पार पडले.