सोलापूर - काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या लोकार्पण सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यास सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी नाकारल्याने भाजपच्या खासदार आणि आमदारांनी पोलीस प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Sharad Pawar 81 Birthday : शरद पवार यांना अंध कलाकाराकडून अनोख्या शुभेच्छा
ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढेल किंवा कोरोना महामारीचे कारण समोर करून ही परवानगी नाकारण्यात आली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाने सोलापुरात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे, कोणालाही सार्वजनिक कार्यक्रम घ्यावयाची असल्यास पोलीस परवानगी आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
शहरातील विविध मंदिरात एलईडीद्वारे होणार होते प्रक्षेपण
भाजप उत्तर पश्चिम मंडळाच्या वतीने सोलापूर शहरातील विविध मंदिरांमध्ये एलईडी स्क्रिनद्वारे काशी विश्वनाथ कॉरिडोरचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार होते. त्याकरिता शहर पोलीस आयुक्तालयाकडून रितसर परवानगी मागण्यात आली होती. पण, सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून आयोजकाला कोरोना महामारीचे कारण पुढे करत परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
भाजप आमदारांनी पोलीस प्रशासनावर व्यक्त केली नाराजी
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून जाणीवपूर्वक परवानगी नाकारून पोलीस प्रशासनाने आपला आडमुठेपणा सिद्ध केला आहे, असे म्हणत माजी पालकमंत्री व विद्यमान भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - Fulbright Scholarship to Disale Guruji : सोलापूरच्या डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची 'फुलब्राईट' स्कॉलरशिप