सोलापूर - दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा संशयितांना सदर बझार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी घातक शस्त्रसाठा जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका अल्पवयीन बालकाचाही समावेश आहे.
आकाश मधुकर दर्जी(वय 20 वर्ष, इरना वस्ती, सोलापूर), अक्षय गणेश कलबुर्गी( वय 20 वर्ष रा मच्छी गल्ली, बेडर पूल लष्कर, सोलापूर), रोहन शशिकांत गायकवाड( वय 19 वर्ष रा, लिमयेवाडी,सोलापूर), रोहन विजय मैनावाले (वय 20 वर्ष रा मच्छी गल्ली, लष्कर,सोलापूर), विठ्ठल रत्नसिंग फटफटवाले( वय महात्मा फुले झोपडपट्टी, बापूजी नगर, सोलापूर), आणि एक विधीसंघर्ष बालक असे सहा जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात आली आहे.
शनिवारी सायंकाळी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांना गुप्तदारामार्फत माहिती मिळाली की, काही व्यक्ती एका ओमनी व्हॅन ( एम एच 13 ए सी 0739) यामधून घातक हत्यारासह निघाले आहेत. डफरीन चौक ते सात रस्ता या मार्गावरून निघाले आहेत. पोलिसांनी ताबडतोब साधारण शनिवारी रात्री 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास सात रस्ता येथील एका महाविद्यालया समोर सापळा लावून थांबले होते. काही क्षणातच ओमनी व्हॅन आली. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, व्हॅनमधील चालकाने गाडी न थांबवता वेगात पुढे निघून लष्कर येथे पळ काढला. पोलिसांनी ओमनी व्हॅनचा पाठलाग करून त्यांना लष्कर येथील नळ बाजार या ठिकाणी असलेल्या एका खासगी रुग्णालयासमोर अडविले.
ओमनी कार थांबवून दरवाजा उघडून पाहिले असता कार मध्ये 6 संशयित आरोपी बसले होते. त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस करून नावे विचारली. तसेच ओमनी कारची झडती घेतली असता, आतमध्ये तलवा , कोयता, सुरा, मिरची पूड, पेट्रोल बाटली आदी साहित्य आढळून आले. पोलिसांनी हा सर्व शस्त्रसाठा जप्त केला. ही कारवाई पीएसआय संजय राठोड, पोलीस नाईक शेख, आरेनवरू, पोलीस शिपाई जाधव, बदुरे, काळजे, सुर्वे आदींनी केली. या कारवाईने मोठा दरोडा हाणून पडण्यात पोलिसांना यश आले आहे.