सोलापूर - एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आषाढी एकादशीच्या ( Ashadi Ekadashi ) महापूजेनिमित्त सोलापूर जिल्ह्यात आले होते. जिल्ह्यातील त्यांच्या पहिल्या एन्ट्रीलाच मोठे राजकीय भगदाड पडले आहे. शिवसेनेचे महापालिका विरोधी पक्षनेते, शिवसेनेचे बडे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या अनेक नेत्यांनी, नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. एका अर्थाने आजच्या या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय उलथापालथीचे सूतोवाच मिळत आहेत. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे गणिते बदलणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोलापूर शहराचा दौरा नसताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सायंकाळी युवा सेना संपर्क प्रमुख मनीष काळजे यांच्या कार्यालयाला भेट दिली.
सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री यांची भेट- शिवसेनेचे सोलापूर महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण, एकनाथ शिंदे, आमदार तानाजी सावंत यांच्या भेटीनंतर अमोल शिंदे यांनी आपला गट बदलला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे सोलापुरातील शिवसेनेला पहिले खिंडार पडले आहे. शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांची उद्धव ठाकरे यांनी पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यामुळे आमदार सावंत यांना मानणारा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होणार हे स्पष्ट आहे.
या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट- माजी महापौर महेश कोठे, महापालिका विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, उमेश गायकवाड, मनोज शेजवाल, प्रथमेश कोठे, माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, माजी नगरसेवक मनोज शेजवाल, उमेश गायकवाड, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, माजी शहरप्रमुख हरीभाऊ चौगुले, माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के, माजी तालुकाप्रमुख चरणराज चवरे, संजय कोकाटे, नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, पंढरपूर विभागाचे उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन स्वागत केले.
हेही वाचा - Weather Update: राज्यात पावसाशी संबंधित घटनांत 76 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढता पाठिंबा- बंडखोरीनंतर सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे. ठाणे येथील 50 हून अधिक नगरसेवक तसेच कल्याण-डोंबिवली येथील नगरसेवकांनी यापूर्वीच शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचे लोण सोलापूरमध्ये आले असून महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी असणारे अमोल शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जाहीररीत्या पाठिंबा दर्शवला आहे. आजची त्यांची भेट ही पुढील राजकीय गणिताची नांदीच म्हणावी लागेल.
राष्ट्रवादीत जाणाऱ्या इच्छुकांची गोची - महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वात शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम तसेच इतर पक्षांचे नेते, नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते. त्यामध्ये सोलापूरचे शिवसेनेचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख आदींचा समावेश होता. या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अनेकदा भेटी घेतल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार ( Government of Mahavikas Aghadi ) कोसळताच राष्ट्रवादीत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.