सोलापूर - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून गर्दीच्या ठिकाणावर बंदी घालण्यात आली होती. यामुळे या कालावधीत नागरिकांची अनेक शुभकार्ये रखडली होती. तर कित्येक युवक-युवती बाशिंग बांधून कधी बोहल्यावर चढणार याची प्रतीक्षा करत होते. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियम व अटी लादून परवानगी दिली आहे. फक्त 50 जणांच्या उपस्थिती मध्ये लग्न समारंभ उरकण्याच्या सूचना या आदेशात दिल्या आहेत.
या आहेत अटी-
- एका लग्नावेळी मंगल कार्यालयात सर्व मिळून 50 व्यक्ती असावे.
- मास्क व सोशल डिस्टन्स असणे बंधनकारक आहे.
- लग्न समारंभावेळी मंगल कार्यालयात हँड वॉश,हँड सानिटायझर,थर्मल स्क्रिनिंग द्वारे प्रवेश देण्यात यावा.
- मंगल कार्यालयातील वातानुकूलित सिस्टीम बंद करावी. सर्व बाजूंनी हवा खेळेल अशी व्यवस्था करावी.
- मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण करावे. लग्न समारंभ सकाळी 9 ते 5 यावेळेत उरकून घ्यावे.
- कोणतीही आजारी व्यक्ती लग्न समारंभास येता कामा नये. लग्न कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर स्त्रियांना, व लहान मुलांना प्रवेश नाकारण्यात यावा.
- सबंधित तहसीलदार यांची परवानगी आवश्यक राहील.
- लग्न समारंभ कार्यक्रमात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे मोबाईल नं व पत्ते नोंद करून सर्व रिकोर्ड तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक राहील.
- कार्यक्रम स्थळी थुंकण्यास प्रतिबंध असेल व तसेच मंगल कार्यालय प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर विवाह सोहळ्यास परवानगी दिली जाणार नाही.
या सारख्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. या आदेशामुळे रखडलेली अनेक लग्न संपन्न होण्यास मार्ग सुकर झाला आहे. लग्नासाठी उतावीळ असलेल्या अनेक नवरदेवना आनंद झाला आहे. तसेच आर्थिक संकटांना तोंड देणाऱ्या मंगलकार्य व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.