सोलापूर - विद्यार्थी काँग्रेस एनएसयूआय(NSUI)तर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी(fuel price hike)च्या तसेच महागाईच्या विरोधात आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde) यांच्या नेतृत्वाखाली व सोलापूर विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यावतीने "बोंबाबोंब आंदोलन" करण्यात आले. डफरीन चौक येथील सुपर पेट्रोल पाच मिनिटे पेट्रोलपंप बंद करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीदेखील केंद्र सरकारचा निषेध करत बोंबाबोंब केली.
पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांचा मुखवटा तयार करून त्यांच्या गळ्यात अमित शाह, अदानी-अंबानी, बाबा रामदेव यांच्या मुखवट्याचा हार घालण्यात आला. मोदींच्या हातात एक पिशवी देऊन सामान्य जनतेचा पैसा पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनाश्यक वस्तू महागाई करून मोदी सरकार लुटत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
'तोपर्यंत आंदोलन करणारच'
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, की कोरोनाच्या महासंकटामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनाश्यक वस्तू दरवाढ करणे म्हणजे मोदी सरकारसाठी लज्जास्पद आहे. सर्वसामान्य जनता महागाईमध्ये होरपळून जात आहे. ही महागाई जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत प्रत्येक पेट्रोलपंपावर आंदोलन चालू राहतील, असा इशारा केंद्र सरकारला देण्यात आला.
आंदोलन करणाऱ्यावर गुन्हे दाखल
यावेळी सोलापूर विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक विनोद भोसले, देवा गायकवाड, तिरूपती परकिपंडला व विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व आंदोलकांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.