सोलापूर - शहरात लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरासाठी आवश्यक इतकी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. लस नसल्याची माहिती असून देखील अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. कोविशिल्डची लस सर्वांना दिली जाणार असून लसीसाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करत लस उपलब्ध होताच सर्वांना दिली जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
लसीकरणाला भरघोस प्रतिसाद मिळाल्याने लसींचा साठा संपला
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर परिसरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत केंद्राच्या आरोग्य मंत्रालयने लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पद्धतीने पालिकेमार्फत सोलापूर शहर आणि परिसरामध्ये केंद्रावर लसीकरण मोहीमवर अधिक भर दिला जात आहे. नागरिकांकडून लसीकरणाच्या मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळाल्याने लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पण, लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने आरोग्य केंद्रवर गर्दी होत आहे. गर्दी होणेही धोक्याचे आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीसाठी गर्दी करू नये. सर्वांना लस दिली जाणार आहे, असे आवाहन पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूरकरांना केले आहे.
शहरासाठी मागविल्या अडीच लाख लसी
सोलापुरातील नागरिकांनी आरोग्य केंद्रात गर्दी करू नये. महापालिकेच्या माध्यमातून लस उपलब्ध झाल्यावर आपल्याला प्रसिद्धी माध्यमातून सांगितले जाईल याची नोंद घ्यावी, अशी माहिती देण्यात आली आहे. सोलापूर शहरासाठी आवश्यक असणाऱ्या अडीच लाख लसीची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे. शासनाकडून लस उपलब्ध होताच लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना लस दिली जाईल. त्यापूर्वी कोणत्याही लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये, असे आवाहन पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
हेही वाचा - आयपीएल सामन्यांवर सट्टा, एका बुकीस अटक