सोलापूर - पोलीस आयुक्तालयाच्या शेजारी हाकेच्या अंतरावर असेलेल्या गुरूनानक चौक येथील तीन दुकाने अज्ञात चोरट्याने बुधवारी पहाटे 3.30 च्या सुमारास फोडली. एका मोबाईल दुकानामध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. पोलीस आयुक्तालयाच्या जवळच चोरी झाल्याने शहरात चर्चा सुरू आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या पोलीस आयुक्त निवासस्थान व पोलीस आयुक्त कार्यालय या शेजारी असलेल्या दुकानात चोरी झाली आहे. साई मोटर्स, सिटी मोबाईल शॉपी, व गणेश इलेक्ट्रॉनिक या दुकानांचे शटर उचकटून व कुलुप तोडण्यात आले आहेत. सिटी मोबाईल दुकानात 15 हजार रुपये रोख रक्कम होती. ती लंपास करण्यात आली आहे.
नेहमी पोलिसांनी गजबजलेल्या ठिकाणी ही चोरी झाली आहे. गुरूनानक चौकात पोलीस पॉईंट देखील आहे. तरी देखील बुधवारी पहाटे 3.30 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानांमध्ये चोरी केली. साई मोटर्स या दुकानामध्ये सीसीटीव्ही होते, त्यामुळे चोरट्याने फक्त शटर उचकटले, कॅमेरे पाहून त्याने आत शिरण्याचा प्रयत्न सोडला. सिटी मोबाईल दुकान चालक हे बुधवारी सकाळी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब सदर बाजार पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली.
एकीकडे लॉकडवून मुळे, कोरोना महामारीने व्यवसायिक व नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना महामारी रोखण्यासाठी विशेष कारवाई केली जात आहे. पण चोरांकडे दुर्लक्ष केल्यामुळे चोऱ्या वाढल्या आहेत.