सोलापूर- देगाव नाका मरीआई चौक येथे असलेल्या रिलायन्स मार्केटसमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकरी विरोधी, जनता विरोधी कायदे राबवून देशातील भांडवलदारांना मोकळीक देऊ पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी माकपच्या नेत्यांनी रिलायन्स मार्केटसमोर मुकेश अंबानी आणि अदानी यांचे पोस्टर फाडून भांडवलदारांचा निषेध केला.
पोस्टर फाडून भांडवलदारांचा निषेध -
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि सिटुचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव अॅड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. रिलायन्स मार्केटच्या गेटसमोर आंदोलनकर्त्यांनी उद्योगपती अंबानी आणि अदानी यांच्याविरुद्ध जोरजोरात घोषणाबाजी करत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे पोस्टर फाडून आडम मास्टरांसह आंदोलकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
रिलायन्स मार्केट गेटसमोर आंदोलनाला फौजदार चावडी पोलीस ठाण्याने परवानगी नाकारली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिलायन्स मार्केटचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. यावेळी जिओचे सिम कार्ड देखील फाडून हवेत उधळण्यात आले. शेवटी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि माकपचे आंदोलन दडपून टाकले.
या आंदोलनात सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसूफ मेजर, नासीमा शेख, नलिनी कलबुर्गी, देशमुख, अशोक बल्ला, अनिल वासम, दत्ता चव्हाण, बाळकृष्ण मल्ल्याळ, आसिफ पठाण, दाऊद शेख, सनी शेट्टी, दीपक निकबे, नरेश दुगाणे आणि असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.