सोलापूर- पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या नवनाथ इंगळे यांच्या वीस वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अनिकेत नवनाथ इंगळे (वय 20 वर्ष,रा, पोलीस मुख्यालय वसाहत, सोलापूर ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अनिकेत इंगळे याने पोलीस मुख्यालयातील घरी लाकडी खांबाला आईच्या साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. याची माहिती मिळताच अशोक चौक येथील पोलीस चौकीचे पोलीस कॉन्स्टेबल घुगे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनिकेतला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांत हळहळ-
अनिकेत हा वालचंद महाविद्यालयात शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी एका लग्न समारंभात त्याने जेवण केले. दिवसभर त्याने इतर मित्रांसोबत वेळ घालविला. रात्री घरी आल्यावर अचानक रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास घेतला. या घटनेने पोलीस मुख्यालयातील वसाहतीमध्ये राहणाऱ्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांत हळहळ व्यक्त केली जात आहे. गळफास का घेतला, याचे कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.