सोलापूर - दोन लाख रुपयांची लाच घेताना पोलीस नाईक गणपतसिंग मोहनसिंग चव्हाण (वय 38 वर्ष नेमणूक सदर बझार पोलीस चौकी) यासह खासगी इसम धीरजकुमार पांडुरंग शिवशरण (वय 34 वर्ष) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खासगी इसमामार्फत दोन लाख स्वीकारले-
गणपतसिंग चव्हाण हा सदर बझार पोलीस ठाणे अंकित सदर बझार पोलीस चौकी अंतर्गत नेमणुकीस आहे. त्याने खासगी इसम धीरजकुमार शिवशरण यामार्फत दोन लाख स्वीकारले. अशा आशयाची फिर्याद सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जुगार गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी घेतली लाच-
तक्रारदाराच्या मित्रावर जुगार कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तक्रारदार यावर देखील कारवाई करणार असल्याची भीती पोलीस नाईक गणपतसिंग चव्हाण हा दाखवत होता. या भीती पोटी तक्रारदार हा सदर बझार पोलीस चौकीला हेलपाटे मारत होता. तक्रारदार याला जुगार कायद्या अंतर्गत कारवाई करणार नाही, त्यासाठी पोलीस नाईक गणपतसिंग चव्हाण याने दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदारने अँटी करप्शन विभाग सोलापूर युनिटमध्ये तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत अँटी करप्शन विभागाने खात्री केली आणि शेवटी शुक्रवारी 8 जानेवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास धीरजकुमार शिवशरण याला दोन लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
या कारवाईमध्ये यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली-
शुक्रवारी रात्री उशीरा 9 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये संजीव पाटील (उपअधीक्षक), जगदिश भोपळे(पोलीस निरीक्षक), रशीद बाणेवाले, श्रीराम घुगे, सनी वाघमारे, यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.