सोलापूर - विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीला 'फोन पे'ची खोटी लिंक पाठवून ऑनलाईन 14 हजार 600 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत सोनाली उत्तम जाधव ( वय 23 रा निर्मिती विहार, विजापूर रोड, सोलापूर) या तरुणीने 14 ऑगस्टला रात्री 10 वाजता तक्रार दाखल केली आहे.
12 ऑगस्ट दुपारी साडेबाराच्या सुमारास सोनाली जाधव हिच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल नंबरवरून खोटी नोटिफिकेशन आली. फिर्यादी तरुणीने या नोटिफिकेशनमधील लिंकवर क्लीक केले असता बँक खात्यातून 4 हजार 600 रुपये वजा झाले.
सोनालीने गुगलवरून फोन पेचा तक्रार क्रमांंक शोधला. त्यावर फोन केला असता त्याने आयडी नंबर टाईप करावयास सांगितले. काही क्षणातच सोनाली जाधव हिच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यामधून 9 हजार 801 रुपये वजा झाले. दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारे दोन अनोळखी व्यक्तींनी ऑनलाईन फसवणूक करत सोनालीच्या बँक खात्यातून 14 हजार 401 रुपये वळते केले. शेवटी सोनालीने 14 ऑगस्टला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या ऑनलाईन फसवणूकीचा अधिक तपास पोलीस नाईक माडे करत आहेत.