सोलापूर- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. त्याअनुषंगाने सोलापूर शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी व्यापारी, कामगार वर्गाचा संताप अनावर झाला आहे. याच मागणीसाठी राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरात आंदोलना सुरू होऊ लागली आहेत. गुरुवारी सकाळी नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात सोलापूर महानगरपालिके समोर विडी कामगार महिलांनी आणि यंत्रमाग कामगार पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यावर गुन्हा दाखल केला. या आंदोलकांची रॅपीड टेस्ट केली असता, एक जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पोलीस उपायुक्त कडुकर यांनी दिली.
223 मधून एकाच अहवाल पॉझिटिव्ह-
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शासनाने वेगवेगळे नियम लावले आहेत. मध्यतरीच्या काळात कोरोना प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे मार्च महिन्यापासून सोलापुरात कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस कोरोना विषाणूचा कहर हळूहळू कमी झाला. मात्र, राज्य सरकारने राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचे नियम आहे, तसेच सुरू ठेवण्याचे सूचित करत १५ जणांचा लॉकडाऊन लागू केला.
सोलापूर शहरात सध्या कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण आटोक्यात आले आहे. त्याअनुषंगाने लॉकडाऊन शिथिल करा ही मागणी जोर धरली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूरकरांना वेठीस धरल्यासारखे झाले आहे. तसेच गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी मागणी करत गुरुवारी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वार समोर माजी आमदार आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगार आणि यंत्रमाग कामगार यांचे ठिय्या आंदोलन झाले. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 223 जणांना ताब्यात घेऊन रॅपिड टेस्ट केली. त्यात एक जण कोरोनाबाधित आढळून आला आहे. तसेचत्या पॉझिटिव्ह आंदोलकाच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली.