सोलापूर - शहर अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेला आहे. याला येथील लोकसेवक, लोक प्रतिनिधी आणि यांच्याशी मिलीभगत असणारी प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. समाजाला अवैध धंद्याचे विष पाजणारे लोक स्वतःला समाजसेवक संबोधतात. हीच या लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे. मटका, जुगार, सावकारी, डान्सबार हे सर्व अवैध धंदे म्हणजे समाजाला लागलेला कर्करोग आहे. याचा अंत अत्यंत भयानक, भीषण असून यातून श्रमिकाला कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी लोक प्रबोधनाची गरज आहे.
वास्तविक पाहता, अवैध धंदे आणि संघटीत गुन्हेगारी पासून समाजाला सुरक्षित ठेवणे, शांतता आणि सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासकीय यंत्रणा आणि न्याय व्यवस्था निर्माण केलेली आहे. जर समाजातील दांभिक, गुंड, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अवैध मार्गाने मलिदा कमवण्यासाठी आणि सामाजिक संतुलन बिघडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणेचा वापर करत असतील तर हा दोष कुणाचा ? असा सवाल माजी आमदार आडम मास्तर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला आहे.
एका रात्री श्रीमंत बनवण्याची खोटी स्वप्ने दाखवून आठवडाभर केलेल्या श्रमाची पुंजी गिधाडासारखे उचलून नेणारा मटका व्यवसाय कुणाच्या कृपा व आशीर्वादाने वर्षानुवर्षे चालत आहे याची पूर्ण माहिती यंत्रणेकडे आहे. कारण यात लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हात काळे झालेले आहेत. सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात संघटीत गुन्हेगारी, सराईत गुंड आणि समाजकंटक यात वाढ होत आहे. याचा दूरगामी परिणाम सुसभ्य समाजावर होत असून सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला बाधा निर्माण होत आहे. वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस प्रशासना मार्फत नि:पक्षपाती चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा सबंध मटका, जुगार, अवैध धंदे यापासून पीडित असलेल्या कुटुंबीय, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक चळवळीत कार्यकर्ते यांना घेऊन महाराष्ट्र राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेस अॅड. एम.एच.शेख, युसुफ शेख, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम आदि उपस्थित होते.