सोलापूर - शहरात धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस रिकोर्डवरील सराईत गुन्हेगाराने तीन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून पळवले आणि त्यामधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपीस अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जयेश राजेश गायकवाड (वय 21 वर्ष रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - महिला अत्याचाराबाबत सरकारला काहीच देण-घेणे नाही - दरेकर
शहरातील दमानी नगर येथील भाजी मंडईमध्ये जयेश गायकवाड याने तीन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिश दाखवत, तुमचे वडील माझ्या ओळखीचे आहेत, अशी थाप मारली आणि दुचाकीवर बसवून रामवाडी परिसरात घेऊन गेला. येथे गायकवाडने तिन्ही मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील एका वॉचमॅनने गायकवाडला हटकले, मात्र तो थांबला नाही.
आरोपी गायकवाड हा तिन्ही पीडितांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्यामधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्याने पीडित मुलींना परत भाजी मंडईमध्ये आणून सोडले. पीडित मुलींनी घडलेली हकीकत पालकांना सांगितली. पालकांनी ताबडतोब फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मुलींना सोबत घेत घटनास्थळी चौकशी सुरू केली. भाजी मंडईसमोर एका खासगी बँकेचा सीसीटीव्ही फुटेज तपासला. त्यामध्ये संशयित आरोपी जयेश गायकवाड हा पीडित मुलींना घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. गायकवाड हा रिकोर्डवरील गुन्हेगार होता. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला व चोवीस तासात त्यास बेड्या ठोकल्या.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर, सहाय्यक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, रमेश भंडारे, पीएसआय सोमनाथ देशमाने, दत्तात्रय कोळवले, विनायक होटकर आदींनी केली.
हेही वाचा - भंडाऱ्यातील घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघड पडले - दरेकर