सोलापूर - घोडा उदळतोय येथे फटाके उडवू नका, असे म्हणणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा बांबूने मारून खून करण्यात आले आहे. महेबूब नबीलाल करणकोट (वय 60 वर्ष, बेघर हौसिंग सोसायटी,विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी तपास करत ताबडतोब पाच संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वृद्ध महेबूब करणकोट यांचा टांगा चालविण्याचा व्यवसाय होता. पण कालांतराने टांगा वाहतूक बंद झाली आहे. अनेकांकडे आजही टांग्याला जुंपणारे घोडे राहिले आहेत. या घोड्यासाठी महिबूब करणकोट यांचा जीव गेला आहे.
घोड्या समोरच फटाके उडवत असताना घोडा उधळत होता -
दिवाळीच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी फटाके वाजविले जात आहेत. फटाके उडविण्यासाठी रात्री 8 ते 10 अशी नियमावली आखून देण्यात आली आहे. पण ही नियमावली कोणीही पाळत नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारी रात्री 11 नंतर विजापूर नाका झोपडपट्टी येथे काही तरुण फटाके उडवत होते. समोरच बांधलेला घोडा फटाक्यांच्या आवाजाने उदळत होता. त्याला महेबूब करणकोट यांनी विरोध केला. यावरून वाद सुरू झाले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
शुभम रणदिवे, मंगेश रणदिवे, व्यंकटेश कोळी, विक्रम क्षीरसागर,राहुल साबळे यांनी शनिवारी मध्यरात्री महेबूब करणकोट यांना लाकडी बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली.या मारहाणीत घोड्याच्या मालकाला डोक्यावर जबरदस्त मार लागला. यामध्ये यांचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी मृत महिबूब करणकोट यांचा मुलगा अलीशेर यांना फोन वरून माहिती कळविली. त्यांनी ताबडतोब शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. शनिवारी सकाळी पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उपायुक्त डॉ वैशाली कडुकर, एसीपी डॉ प्रीती टिपरे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन सर्व माहिती घेतली. आणि संशयित आरोपींचा तपास सुरू केला. शनिवारी दिवसभर पोलिसांनी तपास करून मारहाण करणाऱ्या संशयित आरोपींचा नावे निष्पन्न केली. चौघांना ताब्यात घेतले आहे तर एक संशयित आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.