सोलापूर - जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन सुरू आहे. आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास शंभर ऐवजी पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचा सुधारित आदेश शनिवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावरच(२५ ऑक्टो) हा नियम जिल्ह्यातील सर्व भागात लागू करण्यात येणार आहे. या आदेशामुळे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर एक प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने जरब बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवनियुक्त पोलीस अधीक्षकांच्या मागणीला यश-
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव व वाढते प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्याची संख्या वाढत चालली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली. या बेफिकिरी व्यक्तींना शंभर रुपयांऐवजी पाचशे रुपये दंड करावा, अशी विनंती सातपुते यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 व कलम 64 मधील 36 चा वापर करून दंडाची रक्कम वाढविण्यास परवानगी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्याला नागरिकांची बेफिकीरी कारणीभूत असल्याचेही काही ठिकाणी निदर्शनास येत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर शंभर रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. मात्र, १०० रुपये भरून अनेकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले. मास्कचा वापर केल्याने कोरोना पासून बचाव होऊ शकतो. मास्कची सक्ती करण्यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे. मास्कबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टेंस न पाळणे, दारू, पान, तंबाखूचे सेवन केल्यास देखील कारवाई होणार असल्याचे शंभरकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
500 रुपयांच्या दंडाने जरब बसणार?
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा आदेश पारित केला. यामुळे मास्क न वापरणाऱ्यांना किंवा निष्काळजीपणाने वावरणाऱ्यांना जबर बसणार आहे. यापूर्वी फक्त 100 रुपयांचे दंड असल्याने मास्क न वापरणारे नागरिक बेफिकीर होते. मात्र, आता 500 रुपयांच्या दंडाने निष्काळजीपणाणे वागणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे या आदेशानंतर नागरिकांना जरब बसण्यास मदत होणार आहे. हा आदेश 25 ऑगस्ट पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू झाला आहे. मात्र, या आदेशानंतरतरी जरब बसणार का हे पाहावे लागेल.