सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अट्टल दरोडेखोरास अटक केले आहे. हा दरोडेखोर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दरोडे, घरफोडी करत होता. त्यावर तब्बल 32 गुन्हे रजिस्टर असून सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यासोबत आठ दरोडेखोरांवर गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे. याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुखदेव धर्मा पवार(वय 55 वर्ष, रा, होटगी, ता दक्षिण सोलापूर) अंबादास शंकर गायकवाड(रा होटगी, ता दक्षिण सोलापूर) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यासोबतच असलेल्या आठ दरोडेखोर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपीस 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती संपल्यानंतर आज न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली.
दारूच्या बाटल्यावरील दरोड्यामुळे दरोडेखोर सापडला बियर बार मधील दारोड्यामुळे कुख्यात दरोडेखोर अटक-6 फेब्रुवारी 2022 ला रात्रीच्या सुमारास सोलापूर विजयपूर महामार्गावर एका बियर बारवर मोठा दरोडा पडला होता. याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्यात गंगाराम बयाजी वाघमोडे(वय 34 वर्ष, हॉटेल मॅनेजर) यांनी फिर्याद दिली होती. त्यावर दरोड्याचा गुन्हा देखील नोंद झाला होता. ग्रामीण पोलीस दलातील क्राईम ब्रँचने याचा तपास सुरू केला. दरोडेखोरांनी हॉटेल मॅनेजर गंगाराम वाघमोडे यांचे हातपाय बांधून मारहाण करून रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या असा 2 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या होत्या. सोलापुरातील अनेक हॉटेल आणि बियर बारवर दरोडे पडत असल्याने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आणि एका संशयित आरोपीला सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक केले. अंबादास शंकर गायकवाड यास अटक करून त्याची कसून तपासणी केली असता त्याने सोलापूर विजयपूर महामार्गावर दरोड्या विषयी आणि इतर संशयित आरोपींची माहिती सांगितली.
32 गुन्हे नोंद असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरास अक्कलकोट येथून अटक-अंबादास गायकवाड याने दिलेल्या माहितीप्रमाणे सुखदेव धर्मा पवार(वय 55,रा होटगी, ता दक्षिण सोलापूर)याचे नाव समोर आले. तो आपल्या नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना सोबत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे घालत असल्याची माहिती समोर आली. त्याचा रेकोर्ड तपासला असता , त्यावर 32 गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली. हे 32 गुन्हे सोलापूर,(महाराष्ट्र),कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दाखल आहेत. यामध्ये चोरी, दरोडे, घरफोडी आदी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी सुखदेव पवार याचा तपास केला असता तो देवकार्यासाठी अक्कलकोट येथील वाघदरी येथे गेला होता. पोलिसांनी ताबडतोब वाघदरी येथे सापळा लावून त्याला अटक केले आणि तपास सुरू केला. सोलापूर-विजयपूर महामार्गावर केलेल्या दरोड्याची माहिती घेऊन त्याकडून एक बोलेरो जीप, दारूच्या बाटल्या, चार घरफोडीचा असा 8 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तीन राज्यात धुमाकूळ घातला होता-सुखदेव धर्मा पवार याने तीन राज्यात दरोडे, घरफोडी करून तीन राज्यात धुमाकूळ घातला होता. त्यावर महाराष्ट्र राज्यात 13 गुन्हे दाखल आहेत. कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 18 गुन्हे दाखल आहेत. तर आंध्र प्रदेशात 1 असे एकूण 32 गुन्हे दाखल आहेत. त्यावर मोका अंतर्गत कारवाई देखील होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
8 दरोडेखोर फरार-
आठ दरोडेखोरांचा तपास सुरू असून त्यामध्ये सुरेश धर्मा पवार,राजू रज्जूलाल पवार बापू शंकर काळे राजू पवारचा जावई सोहेम, विनोद बापू पवार,परसु काळे (सर्व रा, होटगी, ता दक्षिण सोलापूर),गिरमल उर्फ गिरमा अंबादास काळे(रा मैनदर्गी, अक्कलकोट, सोलापूर),गोविंद संजय काळे(रा हनमगाव, दक्षिण सोलापूर) हे आठ दरोडेखोर फरार आहेत. त्यांचा तपास सुरू आहे, लवकरच त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, एपीआय रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मणसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख आदींनी केली आहे.