पंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज चैत्र शुद्ध 9 रामनवमी निमित्ताने रंगीबेरंगी फुले व फळांची आरास करण्यात आली आहे. चार प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांमध्ये सावळा विठुराया आणि रुक्माई मातेचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून भाविकांसाठी मंदिर 30 एप्रिलपर्यंत बंद असल्याने या फुलांची आरास याची देही याची डोळा पाहण्याचा योग सध्या तरी नाही, भाविकांना लागलेली विठुरायाच्या दर्शनाची ही आस रामनवमी निमित्ताने ईटीव्ही भारतने व्हिडिओ दृश्यातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
विठ्ठल व रूक्मिणी मातेस चंदनाची उटी
उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळावा म्हणून विठ्ठल व रूक्मिणी मातेस चंदनाची उटी केली जाते. गुढी पाडव्यापासून ज्येष्ठ महिन्यात मृग नक्षत्र निघेपर्यंत ही उटी केली जाते. पांडुरंगास चंदनाची अंगी तर रूक्मिणी मातेस चंदनाची चोळी केली जाते. चंदनाचे लाकूड उगाळून, चंदन गंध कापडामध्ये निथळून घट्ट झालेले गंध उटीसाठी वापरले जाते. या गंधामध्ये केशर टाकल्याने त्याला पिवळा रंग येतो. रामनवमी निमित्ताने विठ्ठल व रूक्मिणी मातेस चंदनाची उटी केले होते.
विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यास 700 टन फुलांची आरास
विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात विविध रंगी फुलांची व फळाची आरास करण्यात आली आहे. त्यात अननस फळाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. गंगाखेड येथील गोविंदराव तांदळे यांच्यावतीने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची ही सजावट करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा, सोळखांबी तसेच विविध भागांना जरबेरा, झेंडू, गुळजाडी अशा विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. त्यात 700 टन फुलांचा वापर करण्यात आला. तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेला परिधान करण्यात आलेला पोशाखही सावळ्या रुपावर नजर खिळवून ठेवत आहे.
हेही वाचा - भारत बायोटेककडून लसनिर्मिती क्षमतेत 20 कोटींनी वाढ