सोलापूर - कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भाग असे मिळून सोलापुरात 962 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोलापुरातील ग्रामीण भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पंढरपूर, माळशिरस आणि बार्शी या तालुक्यात शंभरच्यापुढे रुग्ण वाढले आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णवाढीचा दर मोठा आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनही रुग्णवाढ थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे.
- सोलापूर शहर अहवाल-
सोलापूर शहरात महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने सोलापुरातील 1074 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 239 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 97 रुग्णांनी कोरोना आजारावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील विविध रुग्णालयात 2120 ॲक्टीव्ह रुग्ण असून त्यांवर उपचार सुरू आहेत.
- सोलापूर ग्रामीण अहवाल-
सोलापुरातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने 2367 जणांची तपासणी केली, त्यामध्ये 723 जणांना कोरोना विषाणूने ग्रासले आहे. तर उपचार घेत असलेल्या 243 रुग्णांनी कोरोना आजाराशी दोन हात करून त्यावर मात केली आहे. ग्रामीण भागातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 03 जणांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागातील विविध रुग्णालयात 2927 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांवर उपचार सुरू आहेत.
- तीन तालुक्यात सर्वाधिक वाढ-
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस आणि बार्शी या तीन तालुक्यात कोरोना रुग्णाची मोठी वाढ झाली आहे. पंढरपूर येथे शहर आणि ग्रामीण असे मिळून 197 रुग्ण वाढले आहेत. बार्शी येथे शहर आणि ग्रामीण मिळून 158 रुग्ण वाढले आहेत. माळशिरस येथे शहर आणि ग्रामीण मिळून 102 रुग्ण वाढले आहेत. सर्वात कमी कोरोना रुग्ण अक्कलकोट(9 रुग्ण), सांगोला (16 रुग्ण), दक्षिण सोलापूर(14 रुग्ण), मोहोळ (17 रुग्ण) कमी रुग्ण संख्या म्हणून या तालुक्याची ओळख झाली आहे. मात्र नियमांचं पालन न केल्यास येथे देखील रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.