सोलापूर - केंद्र व राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत व मराठा आरक्षणाबाबत सातत्याने उदासीन भूमिका घेत आहे. त्यामुळे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारचा दशक्रिया विधी व मुंडन करून निषेध आंदोलन करण्यात आले. या दशक्रिया विधी व मुंडण आंदोलनात छावाचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी केंद्र सरकारचा, तर अविनाश पाटील यांनी राज्य सरकारचा दशक्रिया विधी करून मुंडन केले.
सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे दशक्रिया विधी -
महाराष्ट्रातील 30 टक्के मराठा समाजाला गेल्या 70 वर्षापासून कोणतेही शासकीय लाभ, सवलती किंवा फायदे मिळाले नाहीत. त्यामुळे मराठा समाज अन्य जातींच्या तुलनेत शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून खूपच मागे पडलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मनात सामाजिक विषमता आणि राजसत्तेविषयी प्रचंड चीड व राग असून याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. असे असतानाही राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात तर केंद्र सरकारने इंदिरा सहानी निकालातील 50 टक्के मर्यादे विरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही. मराठा आरक्षणाबाबत केंद्र व राज्य शासन घेत असलेल्या उदासीन भुमिकेच्या निषेधार्थ छावा संघटनेने दशक्रिया व मुंडण आंदोलन केले.
27 जूनला राजभवन मुंबई येथे आत्मदहन करणार -
मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने वार्षिक 30 हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज नाही दिले तर छावा संघटनेचे योगेश पवार हे 27 जून 2021 रोजी राजभवन, मुंबई येथे आत्मदहन करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या आंदोलनावेळी छावाचे योगेश पवार, सरपंच वैशाली जयवंत धुमाळ, उपसरपंच रोहन कुमार भिंगारे, संजय पारवे, ग्रामपंचायत सदस्य, जोशी समाज, लिंगायत समाज, गोसावी समाज, बौध्द समाज, वडार समाज, कोळी समाजातील बांधव व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.