सोलापूर - रंगभवन येथील ईदगाह मैदानावर रमजान म्हणजेच ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली.मौलाना ताहेर बेग यांनी उपस्थित मुस्लिम जन समुदायाला आपल्या उपदेशातून शिक्षणाचे महत्व पटवून दिले.मुस्लिम बांधवांनी आणि बहिणींनी शिक्षणाला अधिक महत्व देणे काळाची गरज आहे.सच्चर समितीत दिलेल्या अहवालात मुस्लिम समुदाय शिक्षणापासून लांब जात आहे, असे स्पष्ट नमूद आहे. हे खोदून काढण्यासाठी आपल्या अपत्यांना शिक्षण द्यावे. तसेच कोरोना काळात शिक्षण मागे राहिले आहे.ते भरून काढा असे मौलाना ताहेर बेग यांनी आपल्या प्रवचनातून उपदेश दिला.
दोन वर्षानंतर सामूहिक नमाज पठण - कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सामुदायिक पद्धतीने नमाज पठण झाले नव्हते. मात्र, मंगळवारी सोलापूर शहरात मुस्लिम धर्मीयांचा प्रमुख सण रमजान ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शहरातील रंगभवन इथल्या ईदगाह मैदानामध्ये मुस्लिम समाज बांधवांसह महिलांनी मोठ्या उत्साहात तसेच धार्मिक वातावरणात रमजान ईदची नमाज अदा केली. यावेळी अब्दुल राफे यांनी उपस्थित मुस्लिम समाज बांधवांकडून नमाज अदा करून घेतली. मौलाना ताहेर बेग यांनी नमाज पठणानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना कुरानचे महत्त्व अधोरेखित केले.
मुस्लिम बांधवानी आपल्या स्वभावात बदल करावे - मौलाना ताहेर बेग यांनी कुराणमधील पैलूंवर नागरिकांना संदेश दिला. तसेच पैगंबर मोहम्मद यांच्या काळातील अनेक उदाहरणे दिली. पैगंबर यांनी शांतीचा संदेश दिला आहे. त्यांचा स्वभाव अधिक चांगला होता,यांसारखे स्वभाव प्रत्येक मुस्लिम बांधवानी आचरणात आणावे.
शहरातील सर्व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवाचे आनंद द्विगुणित - सोलापूर शहरात पाच ठिकाणी ईदगाह मैदाने आहेत. यामध्ये होटगी रोड येथे आलमगिर ईदगाह,पानगल शाळेच्या मैदानात शाही आलमगिर ईदगाह मैदान,रंगभवन येथे अहले हदीस ईदगाह,जुनी मिल येथे आदिल शाही ईदगाह,दत्त चौक येथे आसार मैदान येथे ईदगाह.या पाच ठिकाणी शहरातील मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली.